
दक्षिण मध्ये दिलीप माने विरुद्ध अमर पाटील तर मध्य मध्ये आडम मास्तर ?
महाविकास आघाडीत दक्षिण मध्ये बिघाडी
तभा वृत्तसेवा,
सोलापूर, दि. २७ ऑक्टोंबर – काँग्रेस पक्षाची उमेदवारीयादी जाहीर करण्यात आली असून, या यादीमध्ये सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार दिलीप माने यांचे नाव आले आहे. दिलीप माने यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केल्याने दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी आघाडीत बिघाडी निर्माण झालेली आहे. तर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतून माजी आमदार आडम मास्तर यांना सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुस्लिम आणि मोची समाजाच्या दबावाखाली काँग्रेस पक्षाने मध्ये वेगळेचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी गेल्या आणि दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती. महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना यांच्यात या जागेसाठी चढाओढ लागली होती. उद्धव ठाकरे यांनी अमर पाटील यांना दक्षिण सोलापूरसाठी उमेदवारी दिल्यानंतर दक्षिण मध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. माने समर्थकांनी माने यांच्या घरासमोर बैठक घेऊन अपक्ष किंवा काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. त्यानुसार माने यांनी पक्षश्रेष्ठींकडे या जागेसाठी जोर धरला. शेवटी पक्षश्रेष्ठींनी माने आणि त्यांच्या समर्थकांच्या तीव्र भावना लक्षात घेता दक्षिणसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र यामुळे महाविकास आघाडीत दक्षिणसाठी मिठाचा खडा पडलेला आहे.
तर दुसरीकडे शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडे होता मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. मुस्लिम नंतर मोची समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे उमेदवार कोणता द्यावा हा प्रश्न काँग्रेस समोर उभा राहिला आहे. त्यामुळे नाईलाजाने काँग्रेस वेगळाच निर्णय घेण्याची तयारीत आहे. माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांना काँग्रेस पाठिंबा देणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
श्रीशैल हत्तुरे दक्षिणच्या रिंगणात लिंगायत मते खेचणार
अपक्ष उमेदवार श्रीशैल हत्तुरे यांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात उडी मारून निवडणूक अधिक रंगतदार बनवली आहे. हत्तुरे यांना मानणारा मोठा वर्ग दक्षिण सोलापूर तसेच मजरेवाडी परिसरात आहे. त्याचा फायदा श्रीशैल हत्तुरे घेतील अशी चर्चा हत्तुरे वस्ती मंजरेवाडी परिसरात ऐकण्यास मिळत आहे. भाजप पक्षात सक्रिय असणारे हत्तुरे यांनी विविध विकास कामे केली आहेत. त्यांचे चिरंजीव सोलापूर महापालिकेत नगरसेवक असून त्यांनीदेखील या माध्यमातून विविध विकासकामे आणि मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध केला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीकडून संतोष पवार आणि अपक्ष उमेदवार सोमेश्वर वैद्य यांनी देखील निवडणुकीत आघाडी घेतली आहे
आपापल्या परीने विधानसभा मतदारसंघात मतदारांशी भेटीगाठी सुरू केलेले आहेत. त्यामुळे दक्षिण विधानसभा मतदारसंघात आघाडीत झालेली बिघाडी तसेच अपक्ष उमेदवार आणि इतर पक्षाचे उमेदवार यामुळे मतांचेविभाजन मोठ्या प्रमाणात होणार आहे.