सोलापूर शहराचे माजी महापौर तथा प्रसिद्ध शिवपार्वती लॉजचे मालक मनोहर सपाटे यांच्यावर एका 45 वर्षीय विवाहितेनं विनयभंगाचा आरोप केला आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सपाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला पुण्यातील असून 14 जून रोजी शेतीसंबंधी कोर्टाच्या कामासाठी सोलापूरला आल्या होत्या. शिवपार्वती लॉजमध्ये त्या चार दिवस राहिल्या. 16 जूनच्या मध्यरात्री सपाटे यांनी पीडितेच्या खोलीत घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पीडितेनं केला आहे.
महिलेने विरोध करताच, सपाटे यांनी तू तर वेश्या आहेस, आधी धंदा करत होतीस, मग आता का अडचण आहे? अशी अश्लील भाषा वापरून धमकी दिल्याचं देखील आरोप महिलेनं केला आहे.
सपाटे यांनी पीडितेस वारंवार कॉल करून शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा आरोपही पीडितेनं केला आहे. 24 जून रोजी सपाटे यांनी पुन्हा रूम नंबर 307 मध्ये बोलवले असता पीडितेनं स्टिंग ऑपरेशन करून सपाटे यांचा व्हिडिओ बनवल्याचा दावा केला आहे. हा व्हिडीओ, कॉल रेकॉर्डिंग व इतर पुरावे अॅड. पवार यांच्या मदतीने पीडितेने पोलिसांना सादर केले आहेत. त्यानुसार आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.