दिलीप मानेंचे कार्यकर्ते एकवटले; धर्मराज काडादींना दिला एकमुखी पाठिंबा
दिलीप मानेंच्या साथीने धर्मराज काडादींचे पाठबळ वाढले

दिलीप माने यांचे कार्यकर्ते
भाजपविरोधात एकवटले
धर्मराज काडादी यांना पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्धार
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार दिलीप माने यांचा आदेश शिरसावंद्य मानत माने समर्थक कार्यकर्त्यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्धार केला. दुसरीकडे गेली दहा वर्षे सत्तेत राहून सतत त्रास दिलेल्या भाजप आणि त्यांच्या उमेदवाराविरोधात माने समर्थकांनी एकीची वज्रमुठ आवळली. माजी आमदार माने यांच्या पाठबळामुळे धर्मराज काडादी यांचे बळ वाढले आहे.
बुधवारी, सायंकाळच्या सुमारास जिल्हा परिषदेजवळील ब्रम्हदेवदादा माने बँकेच्या सभागृहात माजी आमदार दिलीप माने यांच्या उपस्थितीत समर्थक कार्यकर्त्यांची विधानसभा निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय घेण्यासाठी बैठक झाली. बैठकीच्या सुरूवातीला कार्यकर्त्यांनी मनोगतातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. कार्यकर्त्यांच्या मनोगतानंतर दिलीप माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना एबी फॉर्मसंदर्भात घडलेल्या घडामोडी कथन केल्या. पण आता झाले गेले सर्व विसरुन यापुढे काय करायचे, याच्या निर्णयाचा चेंडू कार्यकर्त्यांवर सोपविला. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी माने हाच आमचा पक्ष आणि ते सांगतील त्यांच्याच पाठीशी आम्ही राहू, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्यानंतर माने म्हणाले, सर्व काही सुरळीत सुरू होते. पण एबी फॉर्मचा अडसर आला. पण आता विधानसभा जाऊ द्या. यापुढे ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका आणि बाजार समितीच्या निवडणुका आहेत. या निवडणुका मला माझ्यासाठी नाही तर कार्यकर्त्यांसाठी लढायच्या आहेत. आता दिलीप माने यांची ताकद काय आहे, हे सार्या राज्याला कळू द्या. आपण इशारा देईल तो उमेदवार निवडून आला पाहिजे. आपल्याला कोण आमदार हवा आहे. निवडून येणारा की आपल्याला त्रास देणारा, याचा कार्यकर्त्यांनी विचार करावा. निर्णयासाठी माने यांनी काही वेळ कार्यकर्त्यांना दिला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आपण सांगाल त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू, अशी ग्वाही दिली.
यावर माने म्हणाले, प्रत्येक पातळीवर आपल्याला त्रास देणार्या माणसाला मदत करण्याऐवजी निवडून येण्याची क्षमता असलेले अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देऊ, असे म्हणताच उपस्थित कार्यकर्त्यांनी हात उंचावून एकमुखी पाठिंबा जाहीर केला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अप्पासाहेब काळे, सचिन गुंड, नागेश बिराजदार, श्रीकांत मेलगे पाटील, प्रा.सतीश दरेकर, प्रथमेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीला बाजार समितीच्या माजी सभापती इंदुमती अलगोंड पाटील, माजी संचालक वसंत पाटील, बापू पाटील, निंगप्पा खुपसंगी, राम गायकवाड, महादेव नरोणे, असिफ शेख, नरसप्पा दिंडोरे, योगीनाथ दिंडोरे, राजू सगरे, धोंडप्पा कलशेट्टी, सचिन गुंड, बाळासाहेब पाटील, भागण्णा आतकर, प्रमोद शिंदे, बनसोडे आदी शेकडे कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट….
टाळ्यांच्या गजरात निर्णयाचे स्वागत
ज्येष्ठ नेते शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांचे नेहमीच आपल्याला सहकार्य व पाठबळ राहिले आहे. भविष्यातही ही नेतेमंडळीच आपल्या पाठीशी राहणार आहेत. त्यामुळे स्वच्छ चारित्र्य, पारदर्शी कारभार आणि निवडून येण्याची क्षमता असलेले अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देऊ, असे माजी आमदार दिलीप माने यांनी जाहीर करताच कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून या घोषणेचे स्वागत केले.
चौकट…..
धर्मराज काडादी यांना हत्तीचे बळ
माजी आमदार दिलीप माने हे स्थानिक राजकारणातील एक वजनदार नेते समजले जातात. हजारो निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या पाठीशी आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या परिवर्तनाच्या लढाईत माने हे आपल्या बलाढ्य आणि तितक्याच निष्ठावंत कार्यकर्ते आणि सहकार्यांसह सहभागी झाल्यामुळे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या उमेदवारीला हत्तीचे बळ आले आहे.